मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पूत्र आणि कोहिनूरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेष जोशी यांची आठ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून सुटका करण्यात आली आहे. ही चौकशी कोहिनूरबाबत नसल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला. तसंच आयएल अँड एफएसच्या चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्मेष जोशी आणि अन्य दोन व्यावसायिकांनी मिळून भागिदारीत व्यवसाय सुरू केला होता. यात आयएलएफएस या संस्थेनं २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत कंपनीने आपले समभाग केवळ ९० कोटी रूपयांना विकले.


समभाग विकल्यावरही आयएलएफएसने कोहिनूर सीटीएनएल या इमारतीसाठी अगाऊ कर्ज दिलं. मात्र या कर्जाचा परतावा कोहिनूरने न केल्याचं सांगितलं जातं आहे. त्यानंतर २०११ मध्ये कोहिनूर सिटीएनएल कंपनीने आपली काही मालमत्ता विकून ५०० कोटींच्या कर्जाचा परतावा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर आयएलएफएसने कोहिनूरला १३५ कोटींचं कर्ज दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी याआधीच ईडीने कोहिनूर सीटीएनएलच्या एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. तर या ईडीच्या नोटीशीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.