दीपक भातुसे, मुंबई :  कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे यावेळी नववीपर्यंत तसेच अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या, तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्याने या दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणार का याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. सरकारही याबाबत गंभीरपणे पावलं टाकत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांवर विद्यार्थ्यांचं पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे या दोन्ही परीक्षा महत्वाच्या मानल्या जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे या परीक्षांचा निकाल वेळेत लागेल की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. कोरोनाचे संकट येण्याआधीच बारावीची परीक्षा पार पडली होती. तर दहावीचा भूगोलाचा पेपर सोडून अन्य सर्व विषयांची परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच पूर्ण झाली होती. पण शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे भूगोल विषयाची परीक्षा आधी पुढे ढकलण्यात आली होती. नंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांबाबत अनिश्चितता संपली आहे, पण दोन्ही परीक्षांचे निकाल लॉकडाऊनमुळे लांबणार का अशी चर्चा विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरु आहे.


राज्य सरकारने मात्र या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहचल्या आहेत. बारावीच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहचल्या असून बहुतांश उत्तरपत्रिका तपासूनही झाल्या आहेत.


दहावीच्या इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका वगळून अन्य विषयांच्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडे पोहचल्या असून त्या तपासण्याचे काम सुरु आहे. इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहचवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.


 



दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लावण्याचा शिक्षण विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून या महत्वाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा येऊ नये याची काळजी घेतली जात आहे.