विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात
राजकीय वर्तुळासह अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली या भेटीतील चर्चा सुमारे एक तासभर चालली
मुंबई: राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अचानकपणे झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. चर्चेचे कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याने दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही बाहेर आला नाही. मात्र, आगामी काळात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील काही जागा या मुंबई परिसरातील असणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमिवर दोघांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजकीय वर्तुळासह अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली या भेटीतील चर्चा सुमारे एक तासभर चालली. दोन्ही नेत्यांकडून अद्याप या भेटीबाबत कोणताही तपशील दिला नाही. त्यामुळे दोघे नेमके काय बोलले असतील अशी उत्सुकता दोन्ही पक्षांच्या (मनसे, भाजप) कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली नाही तरच नवल.