मुंबई : गेल्या ५ वर्षांत राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना संपवण्याचा प्रयत्न झाला, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्याचवेळी अजित पवारांच्या राजीनामानाट्यावर भाष्य करताना सांगितले पवार कुटुंबामध्ये कुठलाही गृहकलह नाही. अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान राजकारणी आहेत. ते खूपच हळवे आणि कुटुंबवत्सल आहेत, असे 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले.


अजित पवार झालेत भावुक आणि...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार हे भविष्यातील राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री आहेत. तशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी टार्गेट केले आणि सातत्याने त्रास दिला, असा आरोप ईडी प्रकरणी केला. ते महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत संचालक होते. हाच काय तो त्यांचा गुन्हा. मात्र, त्यांचा व्यवहारी काहीही संबंध नाही. मात्र, पवार कुटुंबाला त्रास देण्यासाठी सर्व काही चालले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गोवले गेले आहे. काहीही कारण नाही. केवळ आणि केवळ त्रास देण्याचा उद्देश दिसून येत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.



अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यावरुन राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. कौटुंबिक नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, ही बाबही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाकारली असून पवार कुटुंब हा अभेद्य किल्ला असल्याचे म्हटले आहे. अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान राजकारणी आहेत. ते खूपच हळवे आणि कुटुंबवत्सल आहेत. केवळ त्यांचा करडा आवाज आणि देहबोलीवरुन लोक त्यांच्याविरोधात गैरसमज करुन घेत आहेत. त्यांना पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्रास दिला. जेव्हा जेव्हा ते माझ्याजवळ व्यक्त व्हायचे तेव्हा ते या त्रासाबद्दल उद्गीग्नता व्यक्त करायचे, त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे पवार कुटुंबात वाद आहेत या चर्चा बोधट आहेत. 


दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शरद पवारांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’मध्ये पवार कुटुंबांमध्ये बैठक सुरु झाली. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार तसेच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार हे उपस्थित होते. पवार कुटुंब अभेद्य आहे आणि अभेद्यच राहील, असे ते म्हणालेत.