मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल नऊ तासांनंतर खडसे ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कन्याही उपस्थित होत्या. दरम्यान, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. आम्ही ईडीला सर्वप्रकारे सहकार्य केलं, ईडीने मागितलेली सर्व कागदपत्र दिली, काही कागदपत्र देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी दिली. तसंच चौकशीला सहकार्य करण्याचं आश्वासन खडसे यांनी दिल्याचंही वकिलांनी सांगितलं.


विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी भूखंड खरेदीसाठी पैसे जमवल्याचा संशय ईडीला आहे. यात सरकारचा सुमारे 61 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचं चौकशीत प्रथमदर्शनी समोर येतंय. मंत्री पदाचा गैरवापर करून 31 कोटींचा भूखंड खडसेंनी 3 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतला, असा खडसे यांच्यावर आरोप आहे. 


'कारवाईमागे राजकीय सुडाचा वास'


दरम्यान, चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भोसरी इथला हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा नसून तो खासगी मालकीचा आहे, या प्रकरणात आधी पाच वेळा चौकशी झालेली आहे. यात मला क्लीन चीट देण्यात आलेली आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीची चौकशी सुरु झाली आहे. यामुळे हे राजकीय षडयंत्र असल्याचं आपलं मत आहे. असा आरोप खडसे यांनी केला.