मुंबई : शिवसेनेत आजवरचं सर्वात मोठं बंड झालं असताना आजचा दिवस गाजला तो तोडफोड आणि आंदोलनांनी. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले दिसले. अनेक ठिकाणी तोडफोडही झाली. तर एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या बाजुनं मोठा मोर्चा निघाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढून बंडखोरांना पाठिंबा देण्यात आला. आगामी काळात रस्त्यावरची ही लढाई वाढत जाण्याची चिन्हं असताना आता पोलीसही सावध झाले असून मुंबई, ठाण्यासह राज्यातील सुरक्षा वाढवण्यात आलीये. 


दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी यानंतर ट्विट करत शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले की, 'नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित. आपला एकनाथ संभाजी शिंदे.'



दुसरीकडे काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गुजरातमध्ये ही भेट झाल्याचं समजतंय. काल रात्री एकनाथ शिंदे गुजरातला गेले होते. तसंच फडणवीसही काल रात्री मुंबईमध्ये नव्हते. दोघंही गुजरातमध्ये भेटल्याची सूत्रांची माहिती आहे. आता या दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीचं वृत्त फेटाळलं आहे.