Shivsena: धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदे गट या चिन्हावर लढवणार निवडणूक?
Dasara Melava : एकनाथ शिंदे गटाकडून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवली जावू शकते. दसरा मेळाव्यात होणार घोषणा?
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. दोघांकडून शिवसेनेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावा यासाठी संघर्ष सुरु आहे. याचा निकाल आता निवडणूक आयोग (Election Commission of India) लवकरच देणार आहे. पण दोन्ही गटाचा चिन्हावरुन सुरु असलेला संघर्ष पाहता निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जावू शकतं. (Shinde group will contest election on sword symbol)
धनुष्यबाण नेमका कुणाचा या वादात दोन्ही गटाला धक्का बसू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोग ( Election Commission ) चिन्हाबाबतचा निर्णय घेणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ( Andheri East Bypoll ) जाहीर झाली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हासाठी संघर्ष पुन्हा कोर्टात जाण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो.
शिंदे गटाकडून संकेत?
धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले तर शिंदे गट 'तलवार' (Sword) या चिन्हासाठी अर्ज करु शकतो. असे संकेत आहे. कारण दसरा मेळावाच्या निमित्ताने शिंदे गटाकडून बीकेसीवर 51 फूटी तलवारीचं पूजन होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे. या ठिकाणी 100 पेक्षा जास्त एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले तर उद्धव ठाकरे गटाला याचा फटका बसू शकतो. उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक मोठी अग्नीपरीक्षा असणार आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
पोटनिवडणुकीसाठी शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे. शिंदे गटाकडून भाजपच्या उमेदवाराला समर्थन देण्यात आलं आहे. पण ठाकरे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून देखील अर्ज दाखल केला जावू शकतो.
बीकेसी मैदानावर ही 15 फुटांची तलवार आणण्यात आली आहे. याबाबत उद्या घोषणा होणार का याबाबत अजून तरी काही स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही.