जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे उर्जा मंत्री यांनी केला आहे, यावरुन राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे राज्य सरकारचे मंत्री नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊन काळात सर्वांना अन्यायकारक वीज बील दिल्यानंतरही, सरकारचे उर्जा मंत्री नितिन राऊत असं वक्तव्य कसं करु शकतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक तर वाढीव वीज बिल हे सरकारची सर्वसामान्यांचे खिसेकापू भूमिका आहे. ही फसवणूक आहे, सर्वसामान्यांचा वीज बिलाच्या नावाने हा छळ आहे, लॉकडाऊनमध्ये पोटाला काही नाही, ताटात काही नसेल, तरी ज्यांनी वीज चोरली त्या चोरांकडून पैसे वसूल करण्याची हिंमत आणि कुवत सरकारमध्ये नाही, म्हणून सर्वसामान्यांच्या नावावर खोटी वीज बिलं टाकून, पठाणी वसुली करताना सरकारला आनंद होतोय, असंच यातून दिसतंय.


सत्ता गेल्यानंतर सत्ता कधी येईल याची वाट पाहताना विरोधकांनाही राज्यात दुसरे महत्त्वाचे मुद्दे दिसेनासे झाले आहेत. विरोधक आंधळ्यासारखी भूमिका घेत असताना, दुसरीकडे राज्य सरकार वाढीव वीज बिलांवर मिजासखोरी दाखवत असल्याचं दिसून येत आहे.


लॉकडाऊन काळात वीजेचं मीटर रिडिंग घेता आलं नाही, जे अंदाजाने दिलं गेलं, तो अंदाज आता सुधारता येणार आहे. कारण लॉकडाऊन लागण्याआधी काय मीटर रिडिंग होतं आणि आता काय आहे, यावरुन वीजेचा वापर समजू शकतो, तरी वाढीव आणि अन्यायकारक वीज बिल सर्वसामान्य जनतेवर किती दिवस हे सरकार लादणार आहे.


वीजेचा वापर स्पष्टपणे आता समजू शकतो, तरी देखील सर्वसामान्यांची खिसेकापू भूमिका सरकार सुरुच ठेवणार आहे का? हे महाविकास आघाडीचं सरकार सर्वसामान्यांना ठग्स ऑफ महाविकास आघाडीचं सरकार दिसू लागेल, सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा पुन्हा वीज बिलाच्या मुद्द्यावर कापून झाला तरी देखील, हे सरकार भूमिका बदलताना दिसत नाही.


सरकारने मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिलं देऊन ४ महिने उलटले असतील तरी देखील विरोधकांना हा मुद्दा कुठेच दिसत नाहीय. कारण सत्ता गेली, सत्ता गेली, सत्तेची वाट पाहताना विरोधकांची नजर मेली, त्यांना आता सत्तेशियाव प्रभावी मुद्दे दिसत नाहीत आणि त्यांची भूमिकाही आंधळी झाली असंच म्हणावं लागेल. वाढीव वीज बिल वसुलीसाठी सरकार जेवढं कारणीभूत आहे, तेवढेच विरोधक देखील.


सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधक अजूनही गाजावाजा करत असले, तरी एकाच वेळेस वाढीव वीज बिलांवर आंदोलन करण्याची धग विरोधकांमध्ये राहिलेली नाही का? वीजेच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला आंदोलनातून शॉक देऊन, अंगाची लाही लाही करण्यासारखा असला तरी, विरोधक कुणाची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर ग्रामपंचायतीत जिंकलो जिंकलो म्हणत, अशा पत्त्यांच्या बंगल्यांना पाहूनच विरोधक खुश राहणार आहेत का? तोपर्यंत आम्ही वाढीव वीज बिलाचे पैसे भरण्याची जमवाजमव करतो, एवढंच.