मोठी बातमी! बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, महावितरण अधिकाऱ्याला धमकी देणं भोवणार
धमकी प्रकरणाची उर्जामंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, लोणीकरांविरोधात दिले `हे` आदेश
मुंबई : शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी आणि वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ.राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकाऱ्याला पोलीस संरक्षण?
'ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद इथल्या महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले असल्याचं राऊत यांनी सांगतिलं.
उर्जामंत्र्यांनी काय म्हटलं?
आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिपच्या बातम्यांची उर्जामंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद आणि भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणाऱ्या एका पक्षाचे 30 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे, असा टोला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला.
वीज बिलाची थकबाकी
बबनराव लोणीकर हे 10 लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास 4 लाख आहे. लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची धमकी देणं हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा आणि शासकीय अधिकाऱ्यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचं उर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने इनकम टॅक्स आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिकाऱ्यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली हे अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिकाऱ्यांची माफी मागायला हवी, असं नितीन राऊत यांनी केलं आहे.
दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते,अशी टीकाही नितीन राऊत यांनी केली आहे.