प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : 26 / 11 हल्ल्यानंतर (mumbai 26/11 attack) मुंबईच्या (Mumbai) सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली असली तरीही सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी सागरी किनाऱ्यावर तैनात करण्यात आलेल्या बोटींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या बोटींमध्ये (patrolling boat) दुबईच्या भंगारामधून आणलेले इंजिन लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.


रायगड येथे शस्त्रांसह बोट सापडल्यामुळे सागरी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांना आलेल्या पुन्हा 26/11 करू या धमकीच्या मेसेजमुळे सुरक्षा यंत्रणांच्या किती कार्यरत आहे हे तपासण्याची वेळ आली आहे.


आता धक्कादायक बाब म्हणजे समुद्रकिनारी गस्त घालणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीला दुबई पोलिसांनी भंगारात काढलेले इंजिन लावल्याची माहिती समोर आली आहे.  या प्रकरणी मोटार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये एक आयपीएस अधिकारीही अडकला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


गोवा शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित 28 पेट्रोलिंग बोटी घेण्यात आल्या. 2011-12 मध्ये राज्य सरकारने आणखी 29 बोटी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना काही बोटींवर वेगवेगळ्या कंपनीचे इंजिन बसवण्यात आल्याचे लक्षात आले.


धक्कादायक बाब म्हणजे यातील काही भंगारात दिलेले इंजिन दुबई येथून आयात केले होते. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने चौकशी करून अहवाल दिला असून यामध्ये 7 कोटी 23 लाख 30 हजार 644 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.


याबाबत एक्वॉरियस शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर दांडेकर यांच्यासह गोवा शिपयार्ड , ब्रीलियट शिपिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून या बाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे