मुंबई: कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास मुंबईतून पालकमंत्री ॲङ अनिल परब, जालन्यातून  सार्वजनिक आरोग्य मंत्री  राजेश टोपे, रत्नागिरीतून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहण बने,  आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.


 कोकणला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा  प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.


माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पध्दतीने आगामी काळात जाणीवर जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा.