EXCLUSIVE : मोनिका मोरे पुन्हा अनुभवणार खऱ्या हाताचा स्पर्श
मोनिकावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : ११ जानेवारी २०१४ मध्ये मुंबईतील रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता खरेखुरे हात मिळणार आहेत. मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होत आहे. झी २४ तास तिच्या अपघातापासून ते तिला मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला आहे.
चेन्नई इथं एक ३२ वर्षीय युवक ब्रेन डेड झाल्यानंतर त्याचे हात मोनिकाला बसवले जात आहेत. मध्यरात्री चेन्नई येथून विमानाद्वारे दोन्ही हात आणल्यानंतर डॉ निलेश सातभाईंच्या नेतृत्वात २० जणांची टिम मोनिकावर शस्त्रक्रिया करत आहे. रात्री १२ वाजल्यापासून सुरू झालेली शस्त्रक्रिया अजूनही सुरू आहे. मोनिकाला खरेखुरे हात लागावेत, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्वप्न पूर्ण होतंय.
यावेळी मोनिकांच्या कुटुंबियांनी झी २४ तासचेही आभार मानत लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. यासंदर्भात मोनिकाची आई आणि मोनिकाचे मामा यांच्याशी बातचित केली आहे.