दिपावलीनिमित्त भारतीय कलाकारांचे काळाघोडा येथे प्रदर्शन
२१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर यादरम्यान रंगणार प्रदर्शन-
मुंबई : दिपावली म्हणजे भारतीय सणांचा राजा. हा सण भारतीय पेहरावात साजरा करणे म्हणजे एक पर्वणीच असते. भारतीयांची सणाविषयीची ही चोखंदळ वृत्ती लक्षात घेऊन आर्ट एक्स्पो संस्थेच्या उज्वल सामंत यांनी काळा घोडा येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे. २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९ दरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. उत्पादक आणि डिझायनर्स थेट ग्राहकांच्या भेटीला असणार आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेसे पेहराव निवडण्यास सुलभ होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये संपूर्ण भारतातील हातमाग व हस्तकलेमध्ये वाकबगार असणारे विविध कलाकार आपली कला सादर करणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या वस्त्रनिर्माते आणि डिझायनर्सचा समावेश आहे. अनोखे भारतीय दागिने, मनमोहक चित्रे, हस्तकलेच्या सुंदर वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू आदींचा देखील या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे.
दिपावली म्हणजे आनंदाचा क्षण. हा आनंद पेहरावामुळे वृद्धिंगत करण्यासाठीच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तिंना त्यांची दिपावली अविस्मरणीय करायची आहे त्यांनी एकदा तरी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आर्ट एक्स्पोच्या संचालिका उज्वल सामंत यांनी केले आहे.