Milk Rate : दुधाचे भाव आणखी 5-6 रुपयांनी महागणार?
भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून दुधाची मागणी वाढलीय.
मुंबई : सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. दुधाचे (Milk Rate) भाव येत्या काळात आणखी 5 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पण त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे भारतात दुधाचं उत्पादन कमी होणार आहे. दूधटंचाईची समस्या का निर्माण होणाराय? पाहूयात हा रिपोर्ट. (experts have expressed the fear of reduction in milk production by about 7 to 10 percent)
'दुग्धक्रांती'च्या भारतात दूध टंचाई?
भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून दुधाची मागणी वाढलीय. त्यामुळं लवकरच दूध टंचाईचा सामना करण्याची वेळ येणाराय. दूध उत्पादनात सुमारे 7 ते 10 टक्क्यांनी घट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. दूध उत्पादन घटण्याची नेमकी कारण काय आहेत, ते पाहूया.
'दुग्धक्रांती' घडवणाऱ्या देशात दूध टंचाई?
लम्पी रोगामुळे अनेक दुधाळ जनावरांचा झालेला मृत्यू. जनावरांच्या मुक्त चरण्यावर आलेली बंधनं. जनावरांचे बाजार बंद पडल्यानं घटलेला जननदर. पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ. इंधन, वाहतूक खर्चात झालेली वाढ. वैरण, हिरव्या चा-याची कमतरता अशा विविध कारणांमुळं दूध उत्पादन घटलंय.
केवळ भारतच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपमधील अनेक देशांतही दूध उत्पादन कमी झालंय. त्यामुळं दूधाचे भाव वाढण्याची भीती आहे. एकीकडं दूध टंचाईमुळं शेतक-यांचं अर्थकारण बिघडणार आहे. तर दुसरीकडं दूध दरवाढीमुळं सामान्य लोकांचं किचनचं बजेट कोलमडून पडणाराय. त्यामुळं भविष्यात दूध दूध, पिओ ग्लास फुल्ल असं म्हणण्याची सोय राहणार नाही.