मुंबई : म्हाडाने कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई व कोंकण या विभागीय मंडळांतर्फे काढलेल्या विविध सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२० पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा विहित वेळेत करता आलेला नाही. सदर यशस्वी व पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून 'म्हाडा'तर्फे दिलासा देणारा सदर निर्णय घेण्यात आला आहे. 



मुंबई मंडळातर्फे काढण्यात आलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. कोंकण मंडळातर्फे २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. कोकण मंडळातर्फे सोडतीतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या देकार पत्राची मुदत दि. १५ मार्च, २०२० पर्यंतच होती. 


म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाबाबतची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली असून याची कृपया मुंबई व कोकण मंडळाच्या सोडतीतील संबंधित पात्र व यशस्वी लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे.