आता फडणवीस सरकारचा विस्तार? राणेंचं काय होणार?
केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर आता राज्यातील मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, प्रतिनिधी, मुंबई : केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर आता राज्यातील मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळातही लवकरचं फेरबदल होतील अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विस्ताराबाबत काय निर्णय घेतात आणि राणेंच्या भाजप प्रवेशाचं काय होतंय याकडे सा-यांच लक्ष लागलंय.
मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर लागणारे भ्रष्टाचाराचे आरोप, प्रदेशाध्यक्षांसह काही मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणं, या पार्श्वभूमीवर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला विरोधकांनी आरोपीच्या पिंज-यात उभं केलंय. राज्यातील सरकारला येत्या ऑक्टोबरमध्ये तीन वर्ष पूर्ण होत आहेत.
या कार्यकाळात काही मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री अनेकदा चांगलेच अडचणीत आलेत. आता तर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच विरोधक लक्ष्य करु लागलेत.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांची प्रकरणे बाहेर काढली. प्रकाश मेहतांचा बचाव करताना तर मुख्यमंत्र्यांची चांगलीच अडचण झाली. यापूर्वीही मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, तर काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जातंय.
मंत्रीमंडळ विस्तारात भाजप मंत्र्यासोबतच शिवसेनेचेही काही मंत्री बदलले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना त्यासंदर्भात निर्णय घेईल असं समजतय. आता केंद्रीय मंत्रीमंडाळाचा विस्तार झाल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वीही मंत्र्यांच्या कामगिरीच्या निकषावर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची चर्चा होती. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्याने राज्यातील मंत्रीमंडाळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराबरोबर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतही निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. राणेंना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळेला मंत्रीमंडळात सहभागी करुन घेतले जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडाळाच्या विस्तारानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार आणि नारायण राणे यांचा भाजप प्रवेश याचा निर्णय लवकरच होईल असे संकेत मिळतायत.