दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या काळात फडणवीस सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन भाजप सरकारच्या हातात असलेल्या सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचं फोनवरचं संभाषण ऐकण्यात आले, असा आरोप आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. 


तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणाचीही नव्याने चौकशी करण्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले. कोरेगाव-भीमा प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे. आमच्याकडे अशाप्रकारची अनेक निवेदने आली आहेत. भाजप विरोधात कुणीही विचार मांडले तर त्याला अर्बन नक्सल म्हणायचे, अशी फडणवीस सरकारची भूमिका होती. त्यामुळे या सगळ्याची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही यावेळी देशमुख यांनी दिली. 


विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याचे समजते. कोरेगाव-भीमाची दंगल हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षडयंत्र होते. दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठिशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा तो डाव होता, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रात केल्याचे समजते.