मुंबई : शनिवारी सकाळी ८.०० वाजल्याच्या सुमारास अचानक भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली... हा सगळ्या महाराष्ट्रासहीत अजित पवार यांचे काका शरद पवार यांच्यासाठीही मोठा धक्का ठरला. आपल्याला याबद्दल सकाळीच समजल्याचं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते मात्र अनुपस्थित राहिले. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राची फसवणूक झाल्याचं सांगत 'सरकार आम्हीच बनवणार' असा दावा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केला. याअगोदर तीनही पक्षांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीनं दिरंगाईचं खापर काँग्रेसवर फोडलं तर राष्ट्रवादीनं आमदारांबाबत खात्री करावी असा सल्ला काँग्रसनं दिला... बैठकीत उद्धव ठाकरेंनाही आपला राग अनावर झाला होता. त्यांनीही शरद पवारांसमोर आपला राग व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यानंतर शनिवारी दुपारी ४.०० वाजता पुन्हा एक संयुक्त बैठक बोलावण्यात आलीय. 


'कौटुंबिक वाद नव्हता...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, 'कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा' असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी विश्वासघात करणाऱ्या अजित पवार यांच्यावर कुठलीही टीका केली नाही. शिवाय, सुप्रीया खासदार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपण शिवसेनेसमोर ठेवला नव्हता, असं सांगत कौटुंबिक वादाचा मुद्दा शरद पवारांनी खोडून काढला.


अजित पवारांना आमदारांचा पाठिंबा नाही


'महाविकास आघाडीला १६९ आमदारांचा पाठिंबा होता. अजित पवारांचं कृत्य पक्षाच्या धोरणाविरुद्ध असल्यानं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपसोबत नाही.. गेलाच तर अशा आमदाराचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल. अजित पवारांसोबत राजभवनात ११-१२ आमदार उपस्थित होते. पण आता केवळ सहा - सात आमदार अजित पवारांसोबत आहेत. बाकीचे परत आलेत' असा दावा शरद पवार यांनी केला. 


सरकार आम्हीच बनवणार 


'अजित पवारांनी सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांची फसवणूक केली. त्या सह्या नवीन सरकारला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. ५४ आमदारांचा पाठिंबा असल्याचं अजित पवारांनी भासवलं. त्यामुळे, त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नाही' असं म्हणत त्यांनी 'बहुमत आमच्या बाजुनं आहे. आपणच सत्ता सरकार स्थापन करणार' असल्याचं म्हटलं. यावेळी, आघाडीचं नेतृत्व शिवसेनेकडेच राहील...  आम्ही सर्व संकटाला एकत्र सामोरं जाऊ, असंही शरद पवार यांनी म्हटलं.


लोकशाहीच्या नावानं खेळ सुरू आहे... हा महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक... 'मी' पणाविरोधात ही लढाई सुरू आहे, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.


शपथविधीवेळी राजभवनात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार परतले


अजानतेपणी आपण अजित पवार यांच्या शपथविधीला पोहचल्याचं, अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या परंतु, शरद पवारांकडे परतलेल्या आमदारांनी म्हटलंय. 'रात्री १२ वाजता आम्हाला अचानक फोन आला. सकाळी ७.०० वाजता धनंजय मुंडेंच्या घरी बोलावलं गेलं. तिथं ८-१० आमदार होते... इथून एका बैठकीसाठी जायचंय असं सांगितलं गेलं... पण राजभवनावर जाईपर्यंत पुढे काय होणार? याची पुसटशी कल्पनाही आम्हाला नव्हती. तिथं भाजपचे लोक उपस्थित होते... यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली... राजभवनावर शपथविधी झाला... परंतु, यानंतर आम्ही लगेचच शरद पवार यांना यासंबंधी माहिती दिली... आणि परत आलो...' असा घटनाक्रम या आमदारांनी सांगितला. अजित पवारांसोबत राजभवनात उपस्थित असलेल्या आमदारांपैंकी राजेंद्र शिंगणे, संदीप क्षिरसागर, सुनील भुसारे शरद पवारांसोबत उपस्थित राहिले... आपला शरद पवारांनाच पाठिंबा असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.