न्याय मिळाल्याशिवाय धर्मा पाटलांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी अखेर हक्कासाठी लढा देताना मृत्यूला कवटाळलं आहे.
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी अखेर हक्कासाठी लढा देताना मृत्यूला कवटाळलं आहे. आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपल्या बाबांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं, धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.
मंत्रालयातही न्याय मिळाला नाही
धर्मा पाटील यांच्या बांधाला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांना कित्येक पटींनी जास्तीचा मोबदला जमीनीचा मिळाला, पण त्यांना मंत्रालयाचा खेटा मारूनही मोबदला मिळाला नाही. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणचे शेतकरी होते.
बाबुगिरीमुळे धर्मा पाटलांना न्याय नाही
मात्र ज्या शेतकऱ्यांनी दलालांमार्फत प्रकरण दिली, त्यांना चांगला मोबदला मिळाला, धर्मा पाटील यांनी नियमाप्रमाणे मोबदला मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या, शेतकरी धर्मा पाटील यांचा मंत्रालयातील फोटो देखील इंटरनेटवर सर्वत्र दिसून येत आहे.
विष प्राशन केले पण मुलाला सांगितलं नाही
धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्याचं आपल्या मुलाला देखील सांगितलं नाही, मात्र अचानक त्यांना उल्टी झाल्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांना विषाचा वास आल्याने, धर्मा पाटील यांना सेंट जॉर्जमध्ये दाखल कऱण्यात आलं, त्यांनंतर तेथे व्यवस्थित उपचार मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांना जेजे हॉस्पिटलला हलवण्यात आलं.
अखेर मृत्यूला कवटाळलं
मात्र आज अखेर शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, त्यांची प्राणज्योत मालवली, धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे भाजप सरकारवर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता आहे.