मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह आंबा, केळी आणि फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. जे पिकलं होतं, त्याची पुन्हा एकदा माती झाली. हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसाने झोडपून काढलं. ऐन उन्हाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं.


विदर्भाला तडाखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात वडाळी पिंपरी भागात जोरदार गारपीट झाली. गहू, केळी आणि इतर फळबागांचं मोठं नुकसान झालं. अमरावती जिल्ह्याला दहा दिवसानंतर पुन्हा गारपिटीचा तडाखा बसलाय. अचलपूर तालुक्यात धानोरा गावात गहू, हरभरा पिकांसह फळभाज्यांचं मोठं नुकसान झालं. वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. वर्धा, पुलंगाव,देवळी, आर्वी, समुद्रपूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. जोरदार वारा, पावसामुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर, खामगावातही मुसळधार पाऊस झाला. गहू आणि हरभरा या पिकांची नुकतीच काढणी झाली होती. अचानक पावसामुळे त्याचं मोठं नुकसान झालं.


उत्तर महाराष्ट्रात हानी


धुळे आणि जळगावातही अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले. अवघ्या २० मिनिटांच्या पावसात कोट्यवधींचं नुकसान झालंय. धुळे तालुक्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर भागातही अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अमळनेर आणि चोपडा तालुक्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. यात रब्बीच्या हंगामाचं मोठं नुकसान झालं. केळी, गहू,  हरभरा, मका,बाजरी जमीनदोस्त झाल्याने  शेतकरी हवालदिल झालाय. तर अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल आणि ट्रान्सफॉर्मर उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झालाय. 


मराठवाड्याला फटका


जालना जिल्ह्यातील बदनापूर,परतूर आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसला. गहू जमिनीवर आडवा झाला. कांदा मातीमोल झाला. आंब्याचा मोहोर जमिनीवर गळून पडला. अवघ्या काही दिवसांत या पिकांची सोंगणी आणि मळणी होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार होते. पण गारपिटीमुळे सारं काही उध्वस्त झालंय. याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.


पश्चिम महाराष्ट्रात नुकसान


कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय.