शेतकरी मोर्चाकडे शिवसेना नेत्यांची पाठ : ना आदित्य ठाकरे आले, ना कृषिमंत्री दादा भुसे
शिवसेनेचा एकही मोठा नेता मोर्चात फिरकला नाही.
ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : मुंबईत आज निघालेल्या किसान मोर्चाला भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. सत्ताधारी महाविकास आघाडीचे बडे नेतेही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले. मात्र शिवसेनेचा एकही मोठा नेता मोर्चात फिरकला नाही.
लाखो शेतकऱ्यांचं लाल तुफान राजधानी मुंबईत धडकलं. राज भवनावर शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. आझाद मैदानात झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप असे सत्ताधारी आघाडीचे बडे नेतेही सहभागी झाले... मात्र शिवसेनेचा एकही मंत्री या मोर्चात फिरकला नाही. ना मंत्री, ना बडा नेता कोणीही या आंदोलनात दिसलं नाही.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या मोर्चात सहभागी होतील, असं आधी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र कल्याणला पत्री पुलाच्या उद्घाटनाला गेल्यामुळं आदित्य ठाकरे मोर्चाला येऊ शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत किमान कृषिमंत्री दादा भुसे किंवा अन्य कुणी ज्येष्ठ मंत्री मोर्चात सहभागी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली.
नावापुरतं राहुल लोंढे नावाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं. त्यामुळं अर्थातच शिवसेनेला चिमटा काढण्याची संधी भाजपला मिळाली.
आधीच शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाळलेली नाहीत, अशी टीका होतेय. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळालेली नाही. अशावेळी शिवसेनेनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलीय.