मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.


संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. या संपाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्याने पुणे, मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली.


संपाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद आणि शहरी भागांची कोंडी यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकरी शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा संपकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर आले होते.


यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत  मुख्यमंत्री, आणि शेतकऱ्यांमध्ये सुमारे चार तास मॅरेथॉन चर्चा झाली. या चर्चेत शेतकऱ्यांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या. अखेर बहुतांश मागण्या मान्य झाल्याने हा राज्यव्यापी संप शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आला.