दुर्दशा: कर्जमाफीची रक्कमही जमा नाही, शेतमालाला भावही पडले
शेतकऱ्यांच्या मागे लागलेला ससेमीरा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. त्यातच आता शेतमालाचे भावही प्रचंड घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
मुंबई : शेतकऱ्यांच्या मागे लागलेला ससेमीरा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. त्यातच आता शेतमालाचे भावही प्रचंड घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर अतिउत्साह दाखवत कर्जमाफीची प्रमाणपत्रेही शेतकऱ्यांना वाटली. पण, या कर्जमाफीचा एक रूपयाही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही. जे पैसे जमा झालेत असे सांगितले जात आहे. ते सरकरारने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा कमी आहेत. एका बाजूला शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था असताना शेतकऱ्याच्या शेतमालाल भावही मिळत नाही.
शेतमालाचे भव सध्या प्रचंड घसरले आहेत. सरकारनं कापूस आणि सोयाबीनचा हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू नाहीत. त्यामुळं व्यापाऱ्यांना पडलेल्या दरात कापूस आणि सोयाबीन विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. तर कांद्याचे भाव कडाडले असले तरी, त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर, साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच होतोय. त्यामुळं शेतकरी चोहोबाजुंनी अडचणीत सापडल्याचं चित्र सध्या राज्यात आहे.
लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्यानं गेल्या 2 वर्षांत पहिल्यांदाच 3 हजाराचा टप्पा ओलांडलाय. मात्र ३ हजाराहून अधिक कमाल भाव काही ठराविक मोजक्याच कांद्याला मिळत असून बहुतेक शेतकऱ्यांना २२०० ते २३०० रुपयेच सरासरी दर प्रति क्विंटलला मिळत आहे. मात्र तरी देखील सरासरी भावामध्ये किरकोळ वाढ असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येतं आहे.
दरम्यान, असा सगळा प्रकार सुरू असताना शेतकरी कर्जमाफीतही मोठा घोळ झाल्याचे पुढे येत आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन आलेल्या अर्जांपैकी ३० ते ३५ टक्के माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एकाच आधार नंबरवर शंभरहून अधिक शेतकऱ्यांची नावं असल्याची यादी झी २४ तासच्या हाती लागली आहे. बँकांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नसून, शेतकऱ्यांच्या नावे असलेलं कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीत तफावत आहे.