नवी मुंबई : जीवनात शक्य असेल तेव्हा आणि शक्य असेल तिथे दान करण्याची वृत्ती कायम बाळगा असं आपल्याला अनेकदा सांगण्यात येतं. मुळात दान करण्याची ही वृत्तीच आपल्य़ाला नकळत इतकं मोठं करून जाते की समाज आपल्याकडे आदर्श म्हणूनही पाहू लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नात्यांमध्ये असंच एक अमुल्य दान करत उरण तालुक्यातील धुतूम येथील सुधाकर ठाकूर यांनी वयाच्या 62 व्या वर्षी सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं. 


2011 मध्ये ठाकूर यांच्या मुलाचं लग्न झालं आणि स्नेहा ही त्यांची सून म्हणून घरात आली. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं निदान झालं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन घसरली. 


स्नेहा मागील 8 महिन्यांपासून डायलिसीसवर होती. पण, एका मर्यादेनंतर डॉक्टरांनी तिला किडणी प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला. 


यावेळी किडनी कोण देणार हा मोठा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला आणि आपल्य़ा जीवापेक्षा सुनेचा जीव महत्त्वाचा याच धारणेनं सुधाकर ठाकूर यांनी तिला किडनी देण्याचा निर्णय घेतला. 


दोघांचेही रक्तगट वेगवेगळे. पण, तरीही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांतून ही असाध्य गोष्ट साध्य झाली आणि स्नेहाचा खऱ्या अर्थानं नवा जन्म झाला. 


सासऱ्यांसोबतचं तिचं हे नातं सध्या इतर सर्वांच्या नजरेत आदर्शस्थानी आहे. शिवाय ठाकूर यांनी केलेलं हे दान आणि त्यांची वृत्ती जगण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जात आहे.