मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे विरोधात मुंबईत वेग वेगळ्या ठिकाणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत. विलेपार्ले , खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परवानगी नसताना यात्रा काढणे, गर्दी जमवणे आणि करोना नियमांचे पालन न करणे या बाबत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विरोधकांच्या आरोपात काय तथ्य आहे. कोरोनामध्ये त्यांच्या सभा झाल्या नाहीत का?. कोरोनाचे पालन करत आम्ही जन आशिर्वाद यात्रा काढत आहोत. गोमूत्र शिंपडले तर किटाणू मरतील त्यांनी स्वतःवर गोमूत्र शिंपडून घ्यावे. पूरग्रस्तांना केंद्राने मदत करावी यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी यावा याची जबाबदारी मी घेईल.' अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.


'मुंबई महापालिका हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कुठून कसे पैसे येतात हे मला माहितीय. इंजेक्शन खरेदीत १२ टक्के घेतले यांनी. भ्रष्टाचार उघड करा असे त्यांनी सांगावे, उद्यापासून सुरू करतो. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सीएमना प्रश्न विचारला तर यांना काही माहिती नाही. सलून उघडून बसला आहेस का?. यावेळेला महापालिकेत परिवर्तन झाले पाहिजे. अनेक वाझे निर्माण झालेत. कुंपणच शेत खातंय. आपल्या लोकांना आता युपीत जावून नोकरी करायला जाण्याची वेळ येवू नये. वरचे सरकार आमचे आहे. लवकरच सगळं बाहेर येईल.जास्त हालचाल करू नका, नाड्या आमच्या हातात आहेत.' अशी टीका ही राणेंनी यावेळी केली.


याआधी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेत देखील आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानपाडा, कल्याणमधील खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. भाजप जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल केले आहेत.