Samsung Service Centre ला भीषण आग, अडकलेल्या 10 जणांना काढलं
अग्निशमनच्या दलाच्या माहितीनुसार, लेवल 3 ची आग
मुंबई : सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कांजुर पूर्वेकडील अपेक्स इंडस्ट्रियल इस्टेट परिसरामध्ये असलेल्या एका सॅमसंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीचा भडका उडून ती आजूबाजूच्या इतर गोदामांमध्ये देखील पसरली. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी या गोदामात दहा कर्मचारी होते. त्यांना स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच बाहेर काढले.
अग्निशमन दलाच्या 22 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही नंबर 3 ची आग असल्याच सांगण्यात आलं. रात्री उशिरा ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. फ्रीज आणि एसी चे कॉम्प्रेसर जळाल्यामुळे या आगीत भडका आणखीन वाढला. ज्यामुळे ही आग शेजारी असलेल्या डेकोरेशनच्या गोदामांना देखील लागली.
तसेच काही ऑइलची गोदामे देखील या आगीत जळून खाक झाली . ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज हा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही .