मुंबई : टाटा समूहाचे माजी चेअरमन आणि उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं अपघाती निधन झालंय. पालघरमध्ये त्यांच्या गाडीला अपघात (Cyrus Mistry dies in a road accident) झाला. अपघातानंतर मिस्त्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला येत होते. या दरम्यान दुपारी 3.15 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. अपघातात कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झालाय.


सायरस मिस्त्री हे उद्योग जगतातील मोठं नाव होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. 


सायरस पल्लोनजी मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1986 रोजी झाला. शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे पुत्र होते. 2012 मध्ये रतन टाटा यांनी राजीनामा दिल्यानंतर सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे अध्यक्षपद देण्यात आले होते. पण नंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले.


सायरस मिस्त्री यांना ऑक्टोबर 2016 मध्ये रतन टाटा यांच्याशी मतभेद झाल्याने टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. डिसेंबर 2019 मध्ये, कंपनी कायदा न्यायाधिकरणाने मिस्त्री यांना समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून बहाल केले. परंतु त्याआधी फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हटवण्यात आले.


1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सायरस यांच्या नेतृत्वाखाली पालोनजी समूहाचा व्यवसाय भारतासह जगभरात पसरला.


सायरस मिस्त्री यांनी 2006 मध्ये टाटा समूहात प्रवेश केला. पालोनजी कुटुंबाची टाटा सन्समध्ये 18.4% हिस्सेदारी आहे. यामुळेच टाटा समूहावर या कुटुंबाचे वर्चस्व होते. डिसेंबर 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले. पालोनजी कुटुंबातील सदस्याला टाटा समूहात एवढ्या मोठ्या पदावर जाण्याची ही पहिलीच वेळ होती.


महत्त्वाची बाब म्हणजे टाटा समूहाने 18 महिन्यांच्या शोधानंतर सायरस मिस्त्री यांची (former chairman of Tata Sons) या पदासाठी निवड केली होती. मात्र, नंतर सायरस मिस्त्री यांना राजीनामा द्यावा लागला आणि या पदासाठीचा लढा सर्वोच्च न्यायालयात गेला. या लढाईत सायरस यांचा पराभव झाला आणि टाटा समूहाचा विजय झाला.


शापूरजी पालोनजी ग्रुपचे अध्यक्ष पल्लोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे याच वर्षी 28 जून रोजी 93 व्या वर्षी मुंबईतील राहत्या निधन झाले होते. त्यानंतर आता 3 महिन्यातच मिस्त्री कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.