प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क!
हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीच्या खिडक्या बसवण्यात आल्यात.
मुंबई: मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. ही रेल्वे रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
प्रगती एक्सप्रेसचं हे नवीन रुप अधिक आकर्षक करण्यात आलेय. बदललेल्या रुपातील प्रगती एक्सप्रेस मधून प्रवास करणे अधिक आरामदायक असणार आहे. पुण्यातीलच रेल्वेच्या कोचिंग डेपोमध्ये प्रगती एक्सप्रेसच्या डब्ब्यांचे नुतनीकरण करण्यात आले.
प्रगती एक्सप्रेसचे अंतरग आणि बाह्यरुप देखील बदलण्यात आलेय. हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीच्या खिडक्या बसवण्यात आल्यात. डब्यात भरपूर उजेड राहावा यासाठी एलईडी दिवे बसवण्यात आलेत. डब्यात हवेशीर वातावरण राहावे यासाठी नवीन पंखेही लावण्यात आलेत. प्रत्येक डबा आकर्षक रंगसंगतीद्वारे सजवण्यात आलाय. अधिक स्वच्छता राहावी यासाठी शौचालयात सिरॅमिक टाइल्स बसवण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेतर्फे ५ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा (१० रेक) यामध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. प्रत्येक रेकमध्ये नवीन सुविधा बसविण्यासाठी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.