कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील केईएम रूग्णालयात एक मोठी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. एका 21 वर्षीय तरूणावर हँड ट्रान्सप्लांट म्हणजेच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केईएममध्ये ही हात प्रत्यारोपणाची ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुख्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात पहिल्यांदाच अशा पद्धतीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. तब्बल तेरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या तरूणाला नव्याने हात मिळण्यास मदत झाली आहे.


आतापर्यंत राज्यातील कोणत्याही पालिका किंवा सरकारी रूग्णालयात हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रूग्णालयात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आलीये. केईएमच्या प्लास्टिक सर्जन विभागात काल दुपारपासून सुरू झालेली शस्त्रक्रिया आज पहाटे ४ वाजता यशस्वी झाली.


केईएम रूग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, "हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं फार आव्हानात्मक असतं. या रूग्णाचा उजवा हात ट्रान्सप्लांट करण्यात आला आहे. सध्या रूग्ण आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे." 



यासंदर्भात माहिती देताना प्लास्टिक सर्जन विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी म्हणाल्या, "आमच्यासाठी ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक होती. यामध्ये हाडं, नसा तसंच स्नायू शस्त्रक्रियेदरम्यान जोडावे लागतात. अशा शस्त्रक्रियेसाठी फार पूर्वीपासून तयारी करावी लागते. रूग्णाची परिस्थिती योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एकाचा वर्षाचा कालावधी लागू शकतो." 


केईएम रूग्णालयात झालेली ही शस्त्रक्रिया विविध विभागातील डॉक्टरांची टिमने यशस्वी केली आहे. एका दुस-या रूग्णालयात ब्रेन डेड झालेल्या तरूणाचा हात या 21 वर्षीय तरूणाला बसवण्यात आलाय.