मुंबई : मुंबई पोलिसांनी महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिलेय. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांना देण्यात आलेय. त्यामुळे पोलीस दलात महिला राज दिसून येत आहे.


 महिला अधिकार्‍यांचा सन्मान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस दलात काम करत असलेल्या महिला अधिकार्‍यांना हा सन्मान देऊन  महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्याचे काम मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी केलेय. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आठ महिलांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे.



पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिलांकडे


दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर कायम मुंबई असेत. मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकार्‍यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. यात वांद्रे-कुर्ला संकुलातील पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक म्हणून कल्पना गडेकर या कर्तव्य बजावत असून रोहिणी काळे यांच्याकडे पंतनगर पोलीस ठाणे आणि विद्यालक्ष्मी हिरेमठ यांच्याकडे आरे पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.



सायन पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड सांभाळत असून येत्या काळात ज्योत्स्ना रसम या गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.  


पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा कुलाबा पोलीस ठाण्याची जबाबदारी रश्मी जाधव यांच्याकडे देण्यात आलेय. कुलाब्यापाठोपाठ महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील अशा एअरपोर्ट पोलीस ठाण्याची  जबाबदारी अलका मांडवी यांच्या खांद्यावर, तर लता शिरसाट या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सहार पोलीस ठाण्याच्या येत्या काळात इनचार्ज असणार आहेत.