मुंबई : मुंबईच्या ससून डॉक येथील मत्स्य व्यावसायिक संकटात सापडला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असणारी मासळी साफ करण्यासाठीची २२ गोडाऊन खाली करण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मत्स्य व्यावसायिकांना आलेल्या या नोटीसांमुळे लाखो लोकांना रोजगार देणारा व्यवसाय संकटात सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ मध्ये या वादावर तोडगा काढण्यात आला होता, परंतु त्याची प्रशासनाने अंमलबजावणीच केली नसल्यानं पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. बीपीटीने हे गोडाऊन मत्स्योद्योग महामंडळाला आणि महामंडळाने ती या मत्स्य व्यावसायिकांना भाड्याने दिली आहेत. मत्स व्यावसायिक नियमितपणे महामंडळाकडे भाडे देत आली आहेत. परंतु महामंडळाने हे भाडे गेल्या काही वर्षांपासून बीपीटीला न दिल्याने बीपीटीने ही गोदामं खाली करण्यास सांगितलं होतं. 


परंतु २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात बैठक घेत या बैठकीत थकलेल्या भाड्याच्या मोबदल्यात, राज्य सरकारने बीपीटीला जालना इथं ड्राय पोर्टसाठी जमिन देण्याचं अश्वासन दिलं होतं. परंतु गेल्या ५ वर्षात याची अंमलबजावणी न झाल्याने आता पुन्हा गोडाऊन खाली करण्याच्या नोटीसा आल्या आहेत. या नोटीसांमुळे ससून डॉक येथील मत्स्य व्यावसायिक संकटात सापडला आहे.