लिंबू सरबत बनवणाऱ्या `त्या` विक्रेत्याला मध्य रेल्वेकडून पाच लाखाचा दंड
लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस या पेयांवरही रेल्वे स्थानकांतील स्टॉलवरील विक्रीवर बंदी घालण्यात आली.
मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक ७ आणि ८ वर अस्वच्छ पध्दतीने लिंबू सरबत बनवणाऱ्या विक्रेत्याला मध्य रेल्वेने पाच लाखाचा दंड ठोठावला आहे. निकृष्ट पद्धतीने लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून उघड झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलत फलाटांवर करण्यात येणाऱ्या खुल्या सरबत विक्रीवर अखेर बंदी घातली. त्यामुळे केवळ लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस या पेयांवरही रेल्वे स्थानकांतील स्टॉलवरील विक्रीवर बंदी घालण्यात आली.
लिंबू सरबताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओत लिंबू सरबत तयार करताना होणाऱ्या अस्वच्छ पाण्याचा वापर अगदी स्पष्टपणे दिसत होता. या व्हिडिओनंतर रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून खुल्या सरबत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नुकताच रस्त्यांवरील थंड पेयांच्या केलेल्या पाहाणीमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहाणीत ८७ टक्के नमुन्यांमध्ये दूषित घटक आढळले. लिंबू सरबताच्या घेतल्या गेलेल्या २०४ नमुन्यांपैकी १५७ नमुने पिण्यास घातक असल्याची माहिती समोर आली. अशा धोकादायक पेयांमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊन आरोग्य बिघडण्याचीच भिती आहे.