Weather Update: संपूर्ण देशात आता थंडी जाणवू लागली आहे. दिल्लीत आज कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीची लाट आणि धुक्याचा तडाखा दिल्लीकरांना सहन करावा लागतोय. हवामान खात्याने दिल्लीमध्ये धुक्याचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. येत्या 3 दिवसांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती कशी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी जास्त जाणवतेय. राज्यातील अनेक भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेलंय. निफाडसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाग थंडीचा प्रभाव दिसून येतोय. 


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.


स्कायमेट वेदर रिपोर्टनुसार, आज उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये थंड वातावरण निर्माण होऊ शकतं. बिहारच्या काही भागात आणि राजस्थानमध्ये एक किंवा दोन ठिकाणी थंडीच्या दिवसासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यावर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या भागांमध्ये किमान तापमान तीन ते सहा अंशांच्या दरम्यान आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात किमान तापमान 7-10 अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आलंय. पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये दाट धुकं पडणार आहे. तसंच पुढील दोन दिवसांत उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 26 जानेवारी ते 31 जानेवारीच्या रात्री उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, बिहारमध्ये  दाट धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारताकडील काही राज्यांमध्ये ती इतकी आहे की, सुरक्षेचा उपाय म्हणून आयएमडीने येत्या 28 ते 30 जानेवारीपर्यंत थंडीचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या राज्यांमध्ये घनदाट धुकं पसरलंय.