मोठी बातमी: अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
भाजपचे माजी आमदार अनिल गोटे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल.
मुंबई: भाजपचे माजी आमदार अनिल गोटे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल. गेल्या काही महिन्यांपासून अनिल गोटे भाजपवर नाराज होते. पक्षनेतृत्वाने स्थानिक राजकारणात डावलल्याने गोटे यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखविली होती. मात्र, पक्षाने त्याची दखल न घेतल्यामुळे गोटे यांनी अखेर राष्ट्रवादीची वाट धरली आहे. अनिल गोटे यांनी तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वीच गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेत हे शत्रुत्व संपुष्टात आणले होते.
धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी स्वपक्षाविरोधात आणि भामरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्याचवेळी ते भाजपा सोडतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी एप्रिलमध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता.
अनिल गोटे हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यामुळे गोटे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. ही भेट आपल्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी असल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, एकनाथ खडसे यांची नाराजी पाहता राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.