मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर आज दादरमधल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रूपानं एक टिच्चून बॉलिंग करणारा एक हरहुन्नरी टेस्ट क्रिकेटर हरपला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 21 ओव्हर मेडन आणि 131 डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड आजही अबाधित आहे. ही किमया केली होती ती दिवंगत माजी क्रिकेटर बापू नाडकर्णी यांनी.


1964 मध्ये इंग्लंडविरुद्ध मद्रास इथं त्यांनी ही किमया केली होती. हे त्यांच्या टिच्चून केल्या जाणाऱ्या बॉलिंगचं वैशिष्ट्य ठरलं होतं. त्यांचा तो रेकॉर्ड आजही क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय आहे. बॉलचा हाताच्या बोटांवर मारा होऊन त्यांची बोट वाकडी झाली होती. मात्र तरीही त्यांच्या बॉलिंग अकॅशनमध्ये आणि या अचूकतेमध्ये काही फरक पडला नव्हता. काल त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.