शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे (Karnala Urban Cooperative Bank Scam) माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) कारवाई करत विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) यांच्या 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लि.शी संबंधित बँक फसवणुकीप्रकरणी ईडीने  विवेकानंद पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांची 152 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी तपास करत आहे. त्याच प्रकरणात ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. ईडीकडून कारवाई केलेल्या मालमत्तेमध्ये विवेकानंद पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा  समावेश करण्यत आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात विवेकानंद पाटील यांची एकूण 383 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त  करण्यात आली आहे. हा संपूर्ण घोटाळा 560 कोटी रुपयांचा असल्याचे म्हटलं जात आहे.


रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने या बँकेचे ऑडिट केल्यानंतर त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून याप्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे.


2019-20 मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेच्या सांगण्यावरून लेखापरीक्षण करण्यात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. विवेकानंद पाटील यांच्या मालकीच्या नियंत्रित संस्थांच्या कर्ज खात्यांमध्ये 67 काल्पनिक कर्ज खात्यांद्वारे बँकेतील निधी कथितपणे वळवल्याचे उघड झाले होते. यामध्ये, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी, कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतर संस्थांच्या खात्यांचा समावेश होता.


या 67 काल्पनिक कर्ज खात्यांद्वारे फसवणूक केलेली रक्कम अंदाजे 560 कोटी रुपयांची होती. ही चोरी लपविण्यासाठी, उपलब्ध निधी या काल्पनिक खात्यांमध्ये आणि या खात्यांमधून विवेकानंद पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आला, असा तपास तपास यंत्रणेचा आरोप आहे. या प्रकरणी 15 जून 2021 रोजी ईडीने विवेकानंद पाटील यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत बँकेचे अध्यक्ष आणि माजी पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.