मुंबई: राज्यातील किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाकडून फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत सोशल मीडियावर ही स्पर्धा घेण्यात येईल. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश - विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड - दुर्ग किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक गतवैभव अनुभवता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


स्पर्धा ही व्हिडिओग्राफी व छायाचित्रणाची आहे. स्पर्धा खुली श्रेणी व व्यावसायिक श्रेणी या दोन विभागात असेल.


ज्यांना छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफीमध्ये आवड आहे त्यांच्यासाठी खुली श्रेणी आहे. सर्व स्तरातील लोकांसाठी ही श्रेणी आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये पारितोषिक राहील.


स्पर्धेत दुसरी व्यावसायिक श्रेणी आहे. छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीमधील तज्ज्ञांसाठी ही श्रेणी आहे. यातील छायाचित्रण स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये पारितोषिक राहील.


व्यावसायिक श्रेणीतील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये व तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये असेल. १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. 


स्पर्धकांनी सोशल मिडीयावर त्यांचे फोटो, व्हीडीओ हे #MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह पोस्ट करणे आवश्यक आहे. तसेच पर्यटन विभागाचे @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फाॅलो करावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.