मुंबई : डोंगरी परिसरात असणारी एक चार मजली इमारत मंगळवारी कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास ४० ते ५० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दलाचे प्रयत्न सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील काही जुन्या इमारतींपैकी एक म्हणून या इमारतीकडे पाहिलं जात होतं. १५ कुटुंब  वास्तव्यास असणाऱ्या या इमारतीला पुनर्विकासासाठी एका बिल्डरच्या हाती देण्यात आलं होतं. पण, अद्यापही या इमारतीची पुनर्बांधणी का करण्यात आली नाही हाच प्रश्न म्हाडाकडूनही उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय या प्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी आणि बिल्डरवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. 





सध्याच्या घडीला प्रशासनावर या दुर्घटनेचं खापर फोडण्यात येत असून पुन्हा एकदा म्हाडा आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी दिली. नव्या धोरणांची आखणी करण्यापेक्षा आखलेल्याच धोरणांची अंमलबजावणी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी केली.