मुंबई : जर तुम्हाला कोणी सरकारी कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल तर अशा भुलथापांना बळीपडू नका. मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचं कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मुंबईसह इतर राज्यातील व्यापारांना आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गाठून त्यांना सोशल माध्यमांच्या द्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात मोठ्यात मोठं लोन मिळून देण्याचं आमिष दाखवत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी व्याजदरात मोठं लोन अशा जाहिराती वर्तमानपत्र आणि सोशल मीडीयावर सर्रास बघायला मिळतात पण अशा जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका. तुम्हाला कर्ज तर मिळणार नाहीच पण तुम्ही आणखी कर्जबाजारी व्हाल. शोहेब कासम चांदीवाला, विजय ग्रोव्हर, हिरेन किशोर भोगायता, शफिक बाबूमियाँ शेख उर्फ मामू आणि रवींद्र बाबुराव कामत या पाच जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने अटक केली आहे. गुंतवणूक तसेच व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज असलेल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या होत्या. अशा तक्रारी देशभरातून येत असल्याने गुन्हे शाखेच्या युनिट ११च्या पथकाने तपास सुरू केला. 


कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देणारी मोठी टोळीच यामागे कार्यरत असल्याचे लक्षात आले. ही टोळी मालाड येथील हॉटेल लँडमार्क येथे अशाच एका कामासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली.