प्रशांत अंकुशराव,झी मीडिया,मुंबई : सध्या मोबाईलवर गेम खेळण्याचे वेड लहाणग्यांपासून तरुणांनाही लागले आहे. अनेक तरुण तासंतास तुम्हाला मोबाईलवर गेम खेळताना दिसून येतात. अनेकदा तरुण एकच गेम हा एकत्र खेळताना पाहायला मिळतात. यासाठी ते एकमेकांच्या मोबाईलचाही वापर करतात. मात्र दुसऱ्याला गेम खेळण्यासाठी मोबाईल देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे कोणी तुमच्याकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला तर सावध व्हा. मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. मोबाईल घेतलेली व्यक्ती तुमच्या खात्यातील रक्कम लंपास करु शकते. असाच काहीसा प्रकार गोरेगाव पूर्व येथे पाहायला मिळाला. मोबाईलवर गेम खेळण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला फसवल्याची घटना समोर आली आहे.


गोरेगाव पूर्वमध्ये राहणारे 68 वर्षीय प्रकाश नाईक हे बेस्टच्या सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांना काही रक्कम मिळाली होती. निवृत्त झाल्यानंतर ते कायम दिंडोशी बस डेपोजवळ फेरफटका मारायला जात होते. तिथेच त्यांची ओळख दोन अज्ञात तरुणांसोबत झाली. हळूहळू त्यांचा परिचय वाढला आणि आरोपींनी नाईक यांचा विश्वास संपादित केला.


आम्हाला मोबाईलमध्ये गेम खेळायचा आहे, असं कारण देत दोघांनी नाईक यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन मागितला. यानंतर आरोपींनी नाईक यांच्या फोनमध्ये गुगल पे डाऊनलोड केलं. मग दोन महिन्याच्या अंतराने 22 लाख रुपये काढले. 



फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकाश नाईक यांनी थेट दिंडोशी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार देत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी नाईक यांच्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरु केला. ज्या खात्यात पैसे जमा झाले त्याची तपासादरम्यान चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी  शुभम तिवारी आणि अमर गुप्ता या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.