गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधार कार्ड - संजय राऊत
राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे - संजय राऊत
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड आहे. राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. जे वडडेट्टिवार यांच्या मनात आहे, ते राहुल गांधी यांच्या मनात नाही. राहुल गांधींशी आमचे चांगले संबंध आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधारकार्ड आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी मागणी कोणी करत असेल तर ती तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. गांधी परिवाराबाहेरचे कुणी दिसत नाही, की जे पक्षाला पुढे घेवून जातील. राहुल गांधींनी उत्तम नेतृत्व केल्यानेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये सत्ता मिळाली. राहूल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं, राऊत म्हणाले.
आजही काँग्रेस एक प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण सध्या काँग्रेसची ताकद क्षीण झालीय हे खरं आहे. त्यांनी अंतर्गत मतभेद संपवायला हवेत. त्यांनी स्वत:ला सावरायला हवं. गावागावात कार्यकर्ते असलेला हा पक्ष आहे. वड्डेटीवार यांना जे वाटत आहे, ते राहुल गांधी यांच्या मनात नाही. राहुल गांधी यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. राहुल गांधी हे महाविकासआघाडी सरकार उत्तम चालावे या मताचे, असल्याचंही राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
दरम्यान, अग्रलेखाबद्दल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी समान निधी वाटपाबाबत भूमिका मांडली, जी योग्य आहे. ही काँग्रेस पक्षाची नाराजी नाही, काही आमदार निधीवरुन नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यातून मार्ग काढतील. एकत्र बसून निर्णय घेणं, राज्य सरकारच्यादृष्टिने सोयीचे आहे. याला नाराजी म्हणू नका. आमदारांच्या काही मागण्या असू शकतात. समन्वय समितीतल्या बैठकीत यावर चर्चा होईल, असंही राऊतांनी सांगितलं.