गणेशभक्तांचा प्रवास `बेस्ट` होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिरा
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
Mumbai News Today: बाप्पाच्या आगमनासाठी अवघा एक दिवस उरला आहे. मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. देश-विदेशातून लोक मुंबईत दाखल होतात. मोठ-मोठे गणेश मंडळ, लालबागचा राजा, मुंबईचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्याचबरोबर आकर्षक देखावे पाहण्यासाठीही मोठी गर्दी होते. थोडक्यात काय तर गणेशोत्सवातील दहा दिवस मुंबईत मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट व मेट्रोच्या सेवा वाढवण्यात येणार आहेत. दिवसा बेस्टच्या सेवा नियमित असतात. त्यामुळं वाहतुकीस अडचण येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळेस गणेशभक्तांने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळं रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.
गणेशभक्त आणि पर्यटकांसाठी ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटणार आहे.
कसा असेल बेस्टचा मार्ग
कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ४ मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, ८ मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए – २१ डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार, ए -२५ बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-४२ कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, ४४ वरळी व्हिलेज ते एस. यशवंते चौक (काळाचौकी), ६६ इलेक्ट्रीक हाऊस ते सांताक्रूझ आगार, ६९ डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.
मेट्रोच्या फेऱ्या वाढवणार
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो ७’ मर्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या दोन्ही मार्गिकांवर २० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर सेवेच्या कालावधीत ३० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता बंद होणारी मेट्रो सेवा ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० वाजता बंद होणार आहे.
असं असेल वेळापत्रक
१. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा)
२. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४सेवा)
३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)
४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)
५. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४सेवा)
६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४सेवा)