गणेशगल्ली मंडळातर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा
मुंबईच्या राजा यंदा रामाच्या अवतारात....
दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : अयोध्येतील राम मंदीर प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असलं तरी मुंबईत मात्र अयोध्येतील राम मंदीर उभारण्याची तयारी अंतीम टप्यात आहे.
अयोध्येतलं राम मंदिर मुंबईत साकारलं जातं आहे. 'मुंबईचा राजा' अशी ओळख असलेला गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सवाकडून यंदा अयोध्या राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. या राम मंदिरात 'रामअवतारातला' गणपती विराजमान होणार आहे. या भव्य दिव्य मंदिरात राम सीतेच्या मुर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
राम मंदीर देखाव्याची सध्या इथे जय्यत तयारी सुरु आहे. लालबाग परिसरात राम मंदिराचा या देखाव्याचे काम सुरु आहे. या देखाव्यासाठी तब्बल 60 कारागीर काम करत आहेत. मंदिराची उंची 50 फूट असून रुंदी 70 फूट असणार आहे. तर राम अवतारातील गणपतीची मूर्ती 22 फुटाची असणार आहे. तर मंदीराकडे येण्याचा जो मार्ग आहे. त्याच्या दोन्ही बाजूला राम सीता यांचा जीवन प्रवास विविध छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवला गेला आहे.
गणेशगल्ली मंडळाचे हे 92 वे वर्ष आहे. राम मंदिराचा हा देखावा उभारण्यासाठी आत्तापर्यंत 36 लाख रुपये खर्च आला आहे, तर राम मंदिर उभारण्यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचं मंडळाचं म्हणणं आहे. यंदा विधानसभा निवडणुका असल्याने गणेशोत्सवामध्येही त्याची झलक दिसणार आहे.