आव्वाज बंद! डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम
डीजेंना विसर्जन मिरवणुकीत परवानगी देण्यास राज्य सरकारनं तीव्र विरोध केला होता
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालायनं यंदाही गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ड़ीजे आणि डॉल्बी वाजवण्यावरची बंदी कायम ठेवलीय. ड़ीजे, डॉल्बीच्या मालकांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर अतिम सुनावणी चार आठवड्यानंतर करण्यात येणार आहे. तोपर्यंत सरकारनं घातलेली बंदीही कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर बंदी कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव काळात डॉल्बी आणि डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि वयोवृद्धांना दिलासा मिळाला आहे. उल्लेखनीय म्हणजे डीजेंना विसर्जन मिरवणुकीत परवानगी देण्यास राज्य सरकारनं तीव्र विरोध केला होता.
दरवर्षी गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकांमधील मोठ मोठे डीजे वाजवले जातात. त्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. मात्र यंदा राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून डीजे आणि साऊंड सिस्टीमची गोदामे गणेशोत्सवपर्यंत सील केली होती. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशा प्रकारे कारवाई होत असल्याने आणि अघोषित बंदी घातली जात असल्याने साऊंड सिस्टीम चालक-मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडीयो अँड लाइटिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात धाव घेतली होती... मात्र, न्यायालयानं आज ही याचिका फेटाळून लावलीय.