मुंबई महापालिकेत आणखी एक कचरा घोटळा
महापालिकेत आणखी एक कचरा घोटळा पुढे आलाय. ओला आणि सुक्या कचऱ्यात राडा-रोड्याची भेसळ करणाऱ्या सात कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : महापालिकेत आणखी एक कचरा घोटळा पुढे आलाय. ओला आणि सुक्या कचऱ्यात राडा-रोड्याची भेसळ करणाऱ्या सात कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या अचानक तपासणीत अशा २४ घटना समोर आल्या आहेत. या तपासणीच्या आधारे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सात कंत्रातदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर कचऱ्यामध्ये राडारोड्याची भेसळ करणाऱ्या कंत्राटदारांवर कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
कचऱ्यामध्ये राडारोड्याची भेसळ करुन कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. यामुळे देखील दैनंदिन कचरा संकलनाच्या वजनात काही प्रमाणात घट होऊन कचरा वहन खर्चात बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.
राडारोडा (बांधकाम कचरा / डेब्रिज) वाहून नेणारे कंत्राटदार महापालिकेला प्रती टन रुपये ४० एवढी रक्कम देतात. तर दुसऱ्या कंत्राट प्रकारात ओला व सुका कचरा वहन करण्यासाठी महापालिका प्रती टन सुमारे ८७५ रुपये एवढी रक्कम कंत्राटदाराला देते.ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वाहतूक विषयक कंत्राटातील अटी व शर्तींनुसार कचऱ्यामध्ये राडा-रोडा किंवा गाळ असायला नको. मात्र याबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या अचानक तपासणी दरम्यान २४ घटनांमध्ये कचऱ्यात राडारोड्याची भेसळ केली जात असल्याचे उघड झाले.