मुंबई : दूषित पाण्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला, मानखुर्द, चिंचपोकळी या भागांसह पश्चिम उपनगरांमधील अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एकट्या जुलै महिन्यात मुंबईत १,०१० रुग्णांना अतिसाराने त्रस्त केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अतिसाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढते असून मुंबईकरांनी पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.


कुर्ला, मानखुर्द, लोटस कॉलनी या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी येते. काही ठिकाणी पाण्याला विचित्र वास येत असल्याच्या तक्रारी कुर्ला पूर्वेकडील भागामधील रहिवाशांनी केल्या आहेत. मानखुर्द, लोटस कॉलनीमध्येही दूषित पाण्यामुळे पोटात दुखणे, पोटात मुरडा येण्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येणा‍ऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.