Gatari Kombadi Distribution By Mumbai BJP: गटारीनिमित्त आज भारतीय जनता पार्टीकडून मुंबईमध्ये चक्क कोंबडी वाटप केलं जाणार आहे. या कोंबडीवाटप कार्यक्रमाचं पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर हा कोंबडीवाटप कार्यक्रम कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून राबवला जात असल्याचं नमूद केलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर राज्यातील आघाडीच्या नेत्यांबरोबर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो लावण्यात आला आहे. मात्र या व्हायरल पोस्टर संदर्भातील सत्य समोर आलं आहे. 


मोदी, शाहांपासून मुंबई सचिवांपर्यंत अनेकांचे फोटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टरच्या वरील भागामध्ये केंद्रातील आघाडीच्या भाजपा नेत्यांचे तसेच राज्यातील नेत्यांचे फोटो रांगेत लावण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, नारायण राणे, महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेदरांसहीत अन्य नेत्यांचे फोटो आहेत. त्या खालोखाल भारतीय जनता पार्टीचं नाव आणि निवडणूक चिन्हं दिसत आहे. या बॅनरच्या डावीकडे पंतप्रधान मोदींबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. त्या खाली 'दिप अमावस्या गटारी निमित्त कोंबडी वाटप' असा मजकूर देण्यात आला आहे. या बॅनरवरील माहितीनुसार, मुंबईमधील प्रभादेवीमधील प्रभादेवी नाका येथे पार पडणार आहे.


सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होईल असा दावा


15 जुलै 2023 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून हा कार्यक्रम नियोजित स्थळी पार पडणार असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टरच्या खालील भागात कोंबडी वाटप कार्यक्रमाचे आयोजक बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर असल्याचं म्हटलं आहे. या बॅनरवर मुंबईचे भाजपा सचिव सचिन शिंदेंचा फोटोही छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर कोंबड्याचं चित्रही दिसत आहे.



बॅनरही झालं व्हायरल


तसेच याच कार्यक्रमासंदर्भातील बॅनर्सचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोस्टर प्रमाणेच बॅनरवरील मजकूर आहे. बॅनरवर 'सेवा हेच संघटन' असंही लिहिल्याचं दिसत आहे.


 



खोडसाळ प्रयत्न


हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पोस्टवर फोटो असलेल्या सचिन शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "गेली कित्येक वर्ष दादर-माहीम विभागात मी कार्यरत असून पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. असे असताना काही खोडसाळ प्रवृत्तींनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोंबडी वाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमात माझ्या फोटोचा वापर माझ्या परवानगी शिवाय करून तो व्हायरल करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला आहे. अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम घेण्यास मी सांगितले नव्हते. तसेच याला माझा कोणताही पाठिंबा किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. मी स्वतःही या प्रकाराची चौकशी करत आहे," असं सचिन शिंदेंनी म्हटलं आहे.


लोकांना केलं आवाहन


"ज्यांनी कोणी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे त्यांना योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागेल हे ही मी सांगू इच्छितो. तरी आपणास माझे नम्र निवेदन आहे की सदर माहिती ही खोटी असून त्या पद्धतीचे मेसेज फॉरवर्ड करणे, त्याला प्रसिद्धी देणे हे आपण आपल्या पातळीवर थांबवावे," असं आवाहनही शिंदेंनी केलं आहे.


"माझी प्रतिमा खराब होत आहे"


"मी एक सामाजिक जाणीवा जोपासणारा जबाबदार व्यक्ती असून सदरहू उपक्रमात माझे नाव व फोटो गोवण्यात आल्याने माझी प्रतिमा खराब होत आहे. आपण माझे गेल्या काही वर्षातील कामकाज पाहून ठरवू शकता की, दादर-माहीम विभागात मी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तसेच इतर क्षेत्रात युवा व महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी किती विविध उपक्रम आयोजित केले आहेत," असंही शिंदेंनी म्हटलं आहे.