मुंबई : BJP government in Maharashtra  : महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचबरोबर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत.  ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरीश महाजन म्हणाले, भाजपला महाराष्ट्रात 170 आमदारांचा पाठिंबा आहे, जो 288 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 145 बहुमतापेक्षा खूप जास्त आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला आमचे बहुमत सिद्ध करण्यास सांगितले  जाईल तेव्हा आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ शकतो. कारण  आमच्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे. 


राजकीय घडामोडींमध्ये मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत भाजपने राज्यपालांची भेट मागितलेली नाही. राज्यपालांना भेटण्यापूर्वी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याचे पत्र हवे आहे. या पाठिंब्याच्या पत्रानंतरच भाजप राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा प्रस्ताव देऊ शकेल. तसेच शपथविधीसंदर्भात राजभवनातून मिळालेल्या माहितीनुसार, हवामान पाहता शपथविधी 'इनडोअर'च करण्यात येणार आहे. राजभवनातच आज संध्याकाळी शपथविधी होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे ही बैठक सुरू आहे. बैठकीत भाजपचे बडे नेते पुढील रणनीतीवर चर्चा करत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचले असून शपतविधीनंतर ते पुन्हा गोव्यात जाण्याची शक्यता आहे.