मुंबई: कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची बोटीतून पाहणी करत असताना सेल्फी काढल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी महाजन आणि राज्य सरकारवरविरोधात अक्षरश: रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना आपली बाजू मांडली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटले की, अनेक लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. मी त्यांना नकार देऊ शकत नाही. सध्या संकटाची स्थिती आहे, लोकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र, विरोधकांना फक्त या सगळ्याचे राजकारण करायचे आहे, असा पलटवार महाजन यांनी केला. 


गिरीश महाजन यांनी शुक्रवारी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी ते बोटीतून पूरग्रस्त भागाची पाहणी करत होते. त्यावेळी बोटीतील एका पोलीस अधिकाऱ्याने सेल्फी घेण्याचा धडाका लावला होता. त्याने गिरीश महाजन यांच्याकडे कॅमेरा नेल्यानंतर त्यांनीही हात उंचावून हसत प्रतिसाद दिला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 


गिरीश महाजन पूरपर्यटन करत आहेत का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. पुराच्या पाण्यात बोटिंग करण्याची हौस भागवून घेणारे महाजन यांनी टीकेनंतर शुक्रवारी सांगलीत पाण्यात उतरून पूरग्रस्तांची भेट घेतली. मात्र, याही ठिकाणी त्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर नागरिकांचा संताप पाहून त्यांना काढता पाय घ्यावा लागला.