नवी मुंबई : वाशीतील मॉडर्न शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सायली अभिमान जगताप असे या विद्यार्थीनीचे नाव असून सकाळी ती चाचणी परिक्षा देण्यासाठी शाळेत गेली असताना हा प्रकार घडला. सायलीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अभ्यासाच्या तणावातून तिचा मृत्यू झाला की अन्य कारणास्तव तिचा मृत्यू झाला आहे, याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेतील मृत सायली जगताप ही आरपीआय तुर्भे विभाग अध्यक्ष अभिमान जगताप यांची मुलगी आहे. ती तुर्भे स्टोअर्स विभागात राहण्यास होती. तसेच ती वाशीतील मॉडर्न शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. 


शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परिक्षा सुरु असल्याने सायली मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परिक्षेसाठी शाळेत गेली होती. सायली आपल्यासोबत बॅग घेऊन परिक्षा हॉलमध्ये गेल्याने शिक्षकांनी तिला सोबत आणलेली बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितले. त्यामुळे सायली वर्गाबाहेर बॅग ठेवण्यासाठी गेली. त्याच ठिकाणी ती अचानक कोसळून खाली पडली. 


यावेळी सायलीला फिट आली आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तिला उचलून वर्गात नेले. त्यानंतर तिला व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तिच्या मृत्युनंतर तुर्भे स्टोअर्समध्ये शोककळा पसरली आहे.


याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. कधी-कधी पालकांकडून देखील विद्यांर्थ्यांवर चांगले गुण मिळावे म्हणून जोर दिला जातो. पालकांनी देखील अशा वेळी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांच्या चेहऱ्यावर ताण दिसत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मुलांसोबत योग्य तो संवाद केला पाहिजे.